आईच्या विनयभंगाच्या तक्रारीचा राग मनात धरून तरुणाची हत्या; दौंडमधील सोनवडीत खळबळ, दोघांना अटक!
दौंड | सोनवडी : आईच्या विनयभंगाची तक्रार दाखल झाल्याच्या जुन्या वादातून ३१ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील सोनवडी येथे घडली आहे. अरुण अनिल पवार असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण पवार आणि आरोपी दिनेश विजय पवार यांचे कुटुंबीय नात्यातील आहेत. सुमारे अडीच महिन्यांपूर्वी दिनेशच्या आईने अरुणविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. याच कारणावरून दिनेशच्या मनात अरुणविषयी राग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
१६ नोव्हेंबर रोजी रात्री अरुण हा आपल्या बहिणीच्या घरून सोनवडी येथील घरी जाण्यासाठी निघाला होता. मात्र, तो घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास कार्डलाइन ते पवार पॅलेस रस्त्यावर तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली.
आरोपी दिनेश विजय पवार (वय २०) आणि रुपेश मिथुन राठोड यांनी जुन्या वादातून अरुणला रस्त्यात गाठून त्याच्या चेहऱ्यावर व डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अरुणचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मृताचा भाऊ सुनील पवार यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक ए. एम. बिद्री पुढील तपास करत आहेत.
या घटनेमुळे सोनवडी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

0 Comments